Jan 19, 2009

गझनी उर्फ पाकिस्तान !

सध्या सगळ्यांचं 'गझनी' मधल्या आमीर खान सारखं झालंय..

सगळ्यांचं म्हणजे भारतीय समाजाचं. म्हणजे, ज्यांची मनं अजून वारली नाहीत त्यांचं.. स्वत:पलिकडे थोडासा विचार करण्याची सवड आणि गरज आहे त्यांचं.. उद्याची स्वप्नं पाहतानाही ज्यांची झोप सावध आहे त्यांचं !

आपल्याच प्रतिबिंबात, बलदंड शरीरावर 'कल्पना वॉज किल्ड' आणि 'रिवेंज' असं दिसावं आणि खाडकन सगळ आठवायला लागावं.. खुनशी नि क्रूर खलनायक आठवावा.. त्याने केलेली न भरून येणारी हानी आठवावी.. आणि क्षणापूर्वीच्या शांत मनामधे खळबळ माजावी , प्रचंड उलथापालथ व्हावी.. तसं काहीसं होतंय. अगदी अचानक !

चित्रपट पाहिला असेल तर नावडू देत किंवा कसंही.. पटू देत, अतर्क्य वाटू देत किंवा कसंही... पण बहुतेकांची अवस्था काहीशी तशीच !

ज्याचंत्याचं आयुष्य जसंतसं जगताना, मधेच केव्हातरी एक मोठा आरसा अचानक प्रत्येकाच्या मनासमोर येऊन आदळतो.. आणि मग प्रत्येकाला आपल्यावरचं कोरलेलं काहीतरी दिसू लागतं :

'मुंबई वॉज ऍटॅक्ड',

'पाकिस्तान शूड बी पनिश्ड' !

.. असंच काहीतरी.

मग सगळं सगळं आठवू लागतं.. टिव्हीवर पाहिलं तसं, वर्तमानपत्रात वाचलं तसं, कुणाचा कोण तरी तिथेच होता त्याने/तिने काप-या स्वरात काय काय सांगितलं असेल तसं.. सगळंच !

मग आवेशाने मुठी आवळल्या जातात ! पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचे सर्वात जलद आणि सोपे मार्ग कुठले ह्यावरच्या ज्याच्या त्याच्या मतांची उजळणी होते, शूर पोलिस आणि लष्करी अधिका-यांच्या विषयी कृतज्ञता आणि आदर दाटून येतो, आपल्या नाकर्त्या आणि निर्लज्ज राज्यकर्त्यांच्या नावाने बोटे मोडली जातात आणि...

आणि मग.. १५ मिनिटांनंतर... सर्व हळू हळू शांत होते ! समाजमनावर कोरलेली ती अक्षरे अंधुक होत होत गायब होतात.. समोरचा आरसाही दिसेनासा होते.. क्षणांपूर्वी त्वेषाने भगभगणारे स्मरणदिवे मंद होत जातात.. विस्मृतीचा 'ब्लॅक आऊट' चालू होतो..

मग रोजच्या वेळापत्रकाची, कटकटींची, निरर्थक गप्पांची, स्नेहभोजनांची आणि दिवास्वप्नांची आवर्तने पूर्वीसारखी चालू होतात.

लक्षात ठेवायला हवं नेमकं तेच आठवतं नाही... पुढे काय करावं तेही काही उमजत नाही !

मागे अंधार, पुढे अंधार..

फक्त अव्यक्त क्षोभाची ठिणगी आतमधे फिरते आहे मन अस्वस्थ करत..

काहितरी करायला हवं..

निर्णायक !

काय ? कसं ? आणि नेमकं कुणाविरुद्ध ?

आणि कोण करणार ?

प्रश्न सोपे ! उत्तरं सोपी नाहीत !

पण प्रश्न कुरवाळत बसण्यापेक्षा उत्तरं तर शोधायलाच हवीत.

आततायी आणि बालिश उत्तरं नकोत ! पण 'प्रगल्भ आणि संयमी' वाटणारी पण नेभळट असणारीही नकोत !

हं.. उत्तरं सोपी नाहीत, सरळसोट तर नाहीच नाहीत !
...

आला पुन्हा भिरभिरत तो आरसा !!!

'मुंबई वॉज ऍटॅक्ड !'

'रिवेंज' !

'पनिश पाकिस्तान ! फिनिश टेररिस्ट्स ! '

'स्टॉप टॉकिंग ऍंड ऍक्ट ! .. ऍटलिस्ट धिस टाईम !'

...

पुढची पंधरा मिनिटं काही खरं नाही !